Gandhi Research Foundation

News - गांधीजींच्या विचारातच ग्रामविकासाचा मार्ग- सुभाष जाधव

जीआरएफच्या पदयात्रेला प्रारंभ; पथराडला उत्स्फूर्त स्वागत

जळगाव (दि.31) प्रतिनिधीः- तंत्रज्ञानाच्या युगात महात्मा गांधीजींचे विचार शहरी व ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे काढण्यात येणाऱ्या पदयात्रेसारखे उपक्रम नितांत आवश्यक आहेत. अशा पदयात्रांमधुन लोकसहभागाची जाणिव अधिक वृध्दिंगत होईल, असा विश्वास बी.डी.ओ. सुभाष जाधव यांनी व्यक्त केला.

महात्मा गांधी यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2018 या दहा दिवसांच्या पदयात्रेचा पाळधी येथील स. न. झंवर माध्यमिक विद्यालयापासुन प्रारंभ झाला. याप्रसंगी सुभाष जाधव बोलत होते. पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवून सुरवात करण्यात आली. यावेळी सुभाष जाधव, पंचायत समिती सदस्य मुकुंद नन्नवरे, माजी सरपंच संजय देशमुख, ज्येष्ठ नागरीक मदनलाल झंवर, शरद कासट, मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, उपसरपंच गौतम गोऱ्हाईत, राजू हरिमकर उपस्थित होते.

पुढे बोलतांना सुभाष जाधव यांनी सांगितले की, ग्रामिण विकासासाठी गांधीजींच्या विचारांमधील ग्रामस्वराज्य ही संकल्पना आजच्या युगातही महत्त्वाची वाटते. गावांमध्ये स्वच्छता, शौचालयांचा वापर यासह समाजोभिमूख उपक्रमांची जनजागृती गांधी विचारांच्या माध्यमातून गांधी रिसर्च फाऊंडेशन पदयात्रेच्या माध्यमातून करीत असल्याचे सांगत त्यांनी विशेष कौतूक केले. ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता’ ही प्रार्थनाही उपस्थीतांसमोर त्यांनी म्हटली. मुख्याध्यापक चौधरी यांनी गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त पदयात्रेच्या माध्यमातून नविन युगाची सुरवात होत असल्याचे सांगत त्यांनी विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या पहिल्या भेटीतील एक प्रसंग सांगितला. विद्यार्थ्यांनी गांधीजींनी दिलेल्या सत्य- अहिंसा- प्रेम आणि मानवता या विचारांतून समाजाचा उध्दार केला पाहिजे. असा मोलाचा सल्ला चौधरींनी विद्यार्थ्यांना दिला. श्रद्धेय मोठ्याभाऊंचे ग्रामीण विकासातील प्रेरणायी विचार, त्यांची मानव कल्याणाची स्वप्ने आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचे उपक्रम, पदयात्रेची उद्दिष्टे प्रास्तविकामध्ये विनोद रापतवार यांनी विशद केलीत. यशस्वीतेसाठी झंवर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

पथराडला पदयात्रेचे स्वागत

पाळधी येथून पदयात्रा पथराडला निघाली. गांधीजींच्या विचारांच्या प्रेरणायी घोषणा देत मजल दरमजल निघाली. पथराड गावच्या वेशीवर गावकऱ्यांनी पदयात्रेचे स्वागत केले. पाळधी ते पथराड या 4 कि.मी. पदयात्रेत पथराड गावचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच पूर्ण वेळ सहभागी झालेत. संध्याकाळी पारावरच्या गप्पा या कार्यक्रमात सर्व गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.




Address
Gandhi Teerth, Jain Hills, PO Box 118,
Jalgaon - 425 001 (Maharashtra), India
 
Contact Info
+91 257 2260033, 2264801;
+91 257 2261133
© Gandhi Research Foundation Site enabled by : Jain Irrigation Systems Ltd