Gandhi Research Foundation

News - गांधी पुण्यतिथी निमित्त खेड्यांमध्ये गांधी तीर्थ ची पदयात्रा

दहा दिवस विविध गावांमध्ये गांधी विचारांचा जागर

जळगांव, दि. 27 -1 - 2018- महात्मा गांधी यांच्या 70 व्या पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाउण्डेशनच्या वतीने 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2018 या दहा दिवसांच्या कालावधीत पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. दि. 30 जानेवारी 2018 रोजी पाळधी येथील झंवर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातून या पदयात्रेचा प्रारंभ होईल. यावेळी धरणगांव पंचायत समिती सभापती मंजुषा पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रतापरावजी पाटील, मुकुंदराव नन्नवरे, पंचायत समिती सदस्य अनिलजी कासट, पाळधी(खु) च्या सरपंच वैशाली माळी, माजी सरपंच संजूभैय्या देशमुख, पाळधी बु. चे सरपंच अरुण पाटील, झंवर विद्यालयाचे अध्यक्ष सुनिल मदनलाल झंवर, उद्योगपती शरदभाऊ कासट हे मान्यवर या पदयात्रेला हिरवी झेंडी दाखवतील.

महात्मा गांधी यांचे विचार ग्रामीण भागात पोहोचावेत, ग्राम स्वच्छता, ग्राम विकास उपक्रमात लोकांचा सहभाग वाढावा, गावातील युवकांच्या अंगी ग्राम सफाई व इतर ग्राम श्रम संस्कार व्हावेत या उद्देश्याने दरवर्षी ही पदयात्रा काढली जाते. ही पदयात्रा पथराड, बोरखेडा, हनमंत खेड, निंभोरा, शेरी आदि गावांमध्ये मुक्कामी राहणार पदयात्रेतील सहभागी प्रत्येक गावांमध्ये ग्राम सफाईव्दारे श्रमदानाचे महत्त्व विषद करून देतील.

या पदयात्रेनिमित्त ग्रामीण भागात कृषी क्षेत्रासमवेत शेती पुरक जोडव्यवसाया संदर्भात तज्ज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. लाळखुरकत रोगाची लागण ग्रामीण भागात वाढत असल्यामुळे दि. 2 फेब्रुवारी रोजी बोरखेडा येथे, 4 फेब्रुवारी रोजी हनमंत खेडे तर 07 फेब्रुवारी रोजी धार येथे सकाळी 8 ते 11 या कालावधीत लाळखुरकत लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे.

गांधी विचार संस्कार परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळा

30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या 70 व्या पुण्यतिथीच्या औचित्याने कांताई हॉलमध्ये दुपारी 11.00 वाजता गांधी विचार संस्कार परीक्षेचा जळगाव जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा देखील आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास सेवादास दलुभाऊ जैन आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.बी. पाटील उपस्थित असतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यावर्षी जळगाव जिल्ह्यातील 192 शाळांमधील 18 हजारहून अधिक परीक्षार्थिंनी ही परीक्षा दिली आहे. विशेष उल्लेखनीय बाब अशी की यावर्षी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्ष दत्तात्रय कराळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनीही ही परीक्षा दिलेली आहे.

गत 10 वर्षांपासून गांधी रिसर्च फाउंडेशन या परीक्षा घेत आहे. आतापर्यंत 12 लाखांहून अधिक परीक्षकांनी ही परीक्षा दिलेली आहे. या परीक्षेचा परिघ आता वाढला आहे. भारतात महाराष्ट्रासह 9 राज्यांमध्ये ही परीक्षा घेतली जात आहे. या वर्षापासून जपान आणि फ्रान्स या देशातही ही परीक्षा घेतली जात आहे.
Address
Gandhi Teerth, Jain Hills, PO Box 118,
Jalgaon - 425 001 (Maharashtra), India
 
Contact Info
+91 257 2260033, 2264801;
+91 257 2261133
© Gandhi Research Foundation Site enabled by : Jain Irrigation Systems Ltd