Gandhi Research Foundation

News - गांधी रिसर्च फाउंडेशनच्या गांधी विचार परीक्षार्थिंना पारितोषिक वितरण

जळगाव दि.30 (प्रतिनिधी) – सामाजिक सलोख्या शिवाय प्रगती शक्य नाही, सामाजिक सलोख्यासाठी आजही गांधी विचार आवश्यक आहे असे मत माजी कुलगुरू डॉ. के.बी पाटील यांनी व्यक्त केले. कांताबाई सभागृहात महात्मा गांधीजींच्या 70 व्या स्मृतिदिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गांधी विचार संस्कार परीक्षा जळगाव जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण सोहळा आयोजण्यात आला होता त्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, विश्वस्त दलुभाऊ जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या आरंभी 11 वाजता महात्मा गांधीजींना दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्याहस्ते औपचारिक दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. गांधी रिसर्च फाउडेशनचे सहकारी भुजंग बोबडे यांनी प्रास्ताविकात गांधी विचार परिषदेची माहिती दिली. 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित पदयात्रा, तसेच 2 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत बोरखेडा येथे ‘पारावरच्या गप्पा’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची माहिती विनोद रापतवार यांनी दिली. बा आणि बापू यांच्या 150 व्या जयंती निमित्त होणाऱ्या विविध उपक्रमाबाबत देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. आरंभी जीआरएफचे सहकारी अभिजित कुमठेकर यांनी वैष्णवजन तो हे भजन गायले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी.डी. पाटील यांनी तर आभारप्रदर्शन विश्वजीत पाटील यांनी केले. राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी जिल्ह्यातील शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगात शांती आणि आनंद निर्माण करण्यासाठी गांधीजींचे विचार महत्त्वाचे ठरतात. ज्यावेळी महात्मा गांधीजींच्या निधनाची दुःखद घटना घडली त्यावेळी मी ओसवाल बोर्डिंगमध्ये विद्यार्थी होतो. तो दिवस मला आजही आठवतो अशी आठवण देखील दलुभाऊ जैन यांनी सांगितली. जगाला आज शांती, अहिंसेची गरज आहे त्यासाठी महात्मा गांधीजींचे चरित्र आणि अशा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे विचार पोहोचतात ही महत्त्वाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर म्हणाले. महात्मा गांधीजींचा खेड्याकडे चला हा संदेश प्रत्येकाने आपल्या जीवनात अवलंबावा तसेच आठवड्यातून एकदा तरी खादीचा पोषाख घालावा असे आवाहन देखील त्यांनी उपस्थितांना केले.

गांधी विचार संस्कार परीक्षार्थिंचा गौरव

जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांनी देखील ही परीक्षा दिलेली आहे. दलुभाऊ जैन आणि डॉ. के.बी. पाटील यांच्याहस्ते या दोहोंचा पदक, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि पोलीस उप विभागीय अधिकारी सचिन सांगळे यांनी देखील ही परीक्षा दिलेली असून त्यांच्या पर्यंत प्रमाणपत्र व पदक पोहचविले जातील. 192 शाळांमधील 18 हजार 700 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. पाचव्या इयत्तेपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या 45 विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावर्षी अध्यापकांची देखील परीक्षा घेतली होती त्यात न्यु इंग्लिश स्कूल जामनेरचे दिनकर पाटील प्रथम, ओरियन इंग्लिश मीडियमस्कूलच्या सुषमा कंची व्दितीय तर पाचोरा तालुक्यातल शिंदाड ग्राम विकास विद्यालयचे संजय पाटील तृतीय ठरले.
Address
Gandhi Teerth, Jain Hills, PO Box 118,
Jalgaon - 425 001 (Maharashtra), India
 
Contact Info
+91 257 2260033, 2264801;
+91 257 2261133
© Gandhi Research Foundation Site enabled by : Jain Irrigation Systems Ltd